रत्नागिरीत डी. फार्मसीच्या रिक्त जागांसाठी २९ ऑक्टोबरला संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरीत डी. फार्मसीच्या रिक्त जागांसाठी २९ ऑक्टोबरला संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया
रत्नागिरी :
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे पोस्ट एचएससी डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्मसी) अभ्यासक्रमाच्या रिक्त जागा भरण्यासाठी संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास ही प्रक्रिया शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजीही सुरू राहणार आहे. शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (CAP) चौथ्या फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजता समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना संस्थेच्या www.gpratnagiri.org या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
या समुपदेशन फेरीला उपस्थित राहिल्याने प्रवेश निश्चित होईलच, असे नाही, असे संस्थेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उपलब्ध रिक्त जागा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि लागू असलेल्या प्रवेश नियमांनुसारच प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत.
त्यामुळे इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबतच्या अधिकृत सूचना तपासून आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत उपस्थित राहावे आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाने केले आहे.