रत्नागिरी भूमी अभिलेख विभागाच्या विशेष शिबिरात १३० प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली
रत्नागिरी भूमी अभिलेख विभागाच्या विशेष शिबिरात १३० प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली
रत्नागिरी :
भूमी अभिलेख रत्नागिरी विभागाच्या कामकाजाला गती देऊन नागरिकांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी कोकण प्रदेश (मुंबई) भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक अनिल माने यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या सूचनेनुसार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना समोरासमोर मार्गदर्शन करण्यात आले. या विशेष उपक्रमातून एकाच दिवशी तब्बल १३० प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
शिबिरात स्वामित्व योजना, नकाशा २.०, महानक्षा, ‘आधी मोजणी मग खरेदी’, भूसंपादन मोजणी, कमी-जास्त व आकारफोड पत्रके तसेच लेखाविषयक बाबींचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
मोजणीची कामे अधिक अचूक आणि जलदगतीने करण्यासाठी अत्याधुनिक **‘रोव्हर्स’**चे वाटप करण्यात आले. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेअंतर्गत रस्त्यांची अचूक मोजणी करून जिओ-रेफरन्सिंगच्या माध्यमातून ते नकाशात समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले.
नागरिकांना जलद सेवा मिळावी यासाठी अतितातडीची मोजणी प्रकरणे १४ दिवसांत, तर नियमित मोजणी प्रकरणे २८ दिवसांत निकाली काढण्याची सुविधा लांजा आणि मंडणगड येथे सुरू करण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये ही सुविधा डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत लागू करण्यात येणार आहे.
नागरिकांनी महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून ऑनलाइन नकला तसेच मालमत्तेशी संबंधित माहिती मिळवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.