१५ दिवसांत उपाययोजनांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश
सिंधुदुर्गात पाणीटंचाईवर आगाऊ नियोजन
१५ दिवसांत उपाययोजनांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश
सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी आणि वस्तीत गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने आतापासूनच आगाऊ नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. संभाव्य पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये तात्पुरता पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे अंदाजपत्रक पुढील १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
१५ दिवसांत उपाययोजनांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश
जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीपूर्वी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील पाणीस्रोत, त्यांची सद्यस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईबाबत माहिती दिली. दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी उपलब्ध जलसाठा, विविध प्रकल्पांची स्थिती तसेच आकस्मिक पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचे सादरीकरण केले.
धरणांच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर, पर्यायी जलस्रोत, विहिरींचे पुनर्भरण, नळयोजनांचा विस्तार किंवा अन्य तात्पुरत्या उपाययोजना यांचा विचार करून तातडीने नियोजन करावे, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा आणि नगर प्रशासन विभागांनी संयुक्तपणे आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
ग्रामपंचायतींनी २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ग्रामसभांमध्ये स्थानिक पाणीटंचाईचा आढावा घेऊन आराखडे अंतिम करावेत. हे आराखडे १० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील एकही वाडी किंवा वस्ती पाणीटंचाईच्या नियोजनापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
दरम्यान, पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता पावसाचे पाणी संकलन, स्थानिक जलस्रोतांचे बळकटीकरण, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना यावरही बैठकीत भर देण्यात आला.