सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्पाचा शुभारंभ; ४०० शेतकऱ्यांचा समावेश

0
13
सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्पाचा शुभारंभ; ४०० शेतकऱ्यांचा समावेश
सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्पाचा शुभारंभ; ४०० शेतकऱ्यांचा समावेश

सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्पाचा शुभारंभ

४०० शेतकऱ्यांचा समावेश

सिंधुदुर्ग :
बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू या प्रमुख फळपिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि शाश्वत, तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वळविण्यासाठी जिल्ह्यात AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतीक्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती घडून येईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत कृषी विज्ञान केंद्र आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या सहकार्याने हा दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक, अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा या प्रकल्पात समावेश केला जाणार आहे.
हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि शासन विविध शाश्वत उपाययोजना राबवत आहेत. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोरील अडचणींचे वेळेवर आणि अचूक विश्लेषण करून उपाययोजना करणे शक्य होणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
जगातील अनेक देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापन करत आहेत. सिंधुदुर्गातील शेतकरीही या तंत्रज्ञानाच्या बदलात मागे राहू नयेत, यासाठी स्थानिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी जोड दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असून, नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी AI, डिजिटल प्रणाली आणि आधुनिक कृषी पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४.५० लाख रुपयांपेक्षा अधिक करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे नितेश राणे यांनी सांगितले.
एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. उत्पादन वाढविणे, शेतीचा खर्च कमी करणे आणि पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे यासाठी AI तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस पिकामध्ये या तंत्रज्ञानाचे चांगले परिणाम दिसून आले असून, त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकल्पांतर्गत स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT उपकरणे, उपग्रह प्रतिमा, AI आधारित पीक निरीक्षण आणि डिजिटल मॅपिंग यांचा वापर करण्यात येणार आहे. आंबा आणि काजू पिकांची विविध माहिती संकलित करून तिचे AI प्रणालीद्वारे विश्लेषण केले जाईल. या विश्लेषणाच्या आधारे शेतकऱ्यांना ‘कृषक’ मोबाईल प्रणालीवर मराठी भाषेत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
याशिवाय वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात डिजिटल वॉर रूम, तसेच जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्ड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हवामान, पिकांची स्थिती आणि शेतीसंबंधित विविध बाबींवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here