रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रसाधनगृहासाठी ५ रुपयांची वसुली; ठेकेदारावर कारवाईची युवासेनेची मागणी
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रसाधनगृहासाठी ५ रुपयांची वसुली; ठेकेदारावर कारवाईची युवासेनेची मागणी
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून लघुशंकेसाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे युवासेनेने केला असून संबंधित ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी कोंकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांना निवेदन सादर केले. रेल्वे स्थानकावरील ‘पे अँड युझ टॉयलेट’च्या फलकावर लघुशंकेसाठी प्रति व्यक्ती ५ रुपये शुल्क नमूद करण्यात आले असून हे शुल्क प्रवाशांकडून सक्तीने वसूल केले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे स्थानकांवरील लघुशंकेची सुविधा प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत असणे बंधनकारक आहे. मात्र, रत्नागिरी स्थानकावर या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा दावा युवासेनेने केला आहे. प्रसाद सावंत म्हणाले की, “दररोज हजारो प्रवासी, विशेषतः कोकणात येणारे चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवाशांना या बेकायदेशीर वसुलीचा फटका बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या नाकाखाली हा प्रकार सुरू असणे संतापजनक आहे.” युवासेनेने आपल्या निवेदनात लघुशंकेसाठी आकारले जाणारे ५ रुपये शुल्क तात्काळ बंद करून ही सुविधा मोफत करण्याची मागणी केली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारावर कडक दंडात्मक कारवाई करावी आणि “लघुशंकेसाठी कोणतेही शुल्क नाही, ही सुविधा मोफत आहे” असे फलक स्थानक परिसरात ठळकपणे लावावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्यास युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रवाशांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास संबंधित ठेकेदाराचा प्रतिनिधी तेथे दिसणार नाही, असा इशाराही प्रसाद सावंत यांनी दिला. यावेळी रत्नागिरी रेल्वे स्थानक रोडवरील दुभाजकातील झाडांच्या फांद्या वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांची छाटणी करण्याची मागणीही करण्यात आली. या वेळी रितेश लोखंडे, नीलेश पवार, साई गावडे, निखिल बने आणि ओमकार कारेकर उपस्थित होते.