रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे परिसरात बिबट्याचा वावर
रत्नागिरी l प्रतिनिधी
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. गावातील सोनारवाडी भागात मागील महिन्यात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वाडीतून एका घराजवळ बांधलेल्या कुत्र्याचीही शिकार झाली होती.
गुरुवारी पाडावेवाडी परिसरात बिबट्याचे दोन बछडे समवेत दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती अधिक वाढली आहे. मिरजोळे, सोनारवाडी आणि गुरववाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याचे हल्ले झालेले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पाडावेवाडीतील दत्ताराम पाडावे यांच्या घराजवळ अंगणात साळखदंडाने बांधलेल्या कुत्र्याला पाच दिवसांपूर्वी बिबट्याने मानेचा चावा दिला आणि नंतर तो पसार झाला होता. मात्र, गेल्या मंगळवारी रात्री बिबट्याने हा कुत्रा ओढून रानात नेल्याची घटना घडली. या घटनांमुळे परिसरातील नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत आणि प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


