रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड
सातारा : राज्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करणाऱ्या या संस्थेत रोहित पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर रोहित पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संस्थेतील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. मागील सहा वर्षांपासून संस्थेचे सदस्य म्हणून सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्था ही ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी ओळखली जाते. रोहित पवार यांच्या निवडीमुळे संस्थेच्या शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.