राजापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला
राजापूर l प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील मूर गावात बुधवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून रविंद्र भांबाडे यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे मूर, वाळवड, काजिर्डा, कोळंब व तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रात्री सुमारे १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
रविंद्र भांबाडे हे कोळंब तिठा येथील आपल्या घरात एकटेच राहत होते. त्यांच्या घराशेजारी दाट जंगल व झाडी असल्याने या भागात बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. बुधवारी रात्री घराजवळील कुत्रा सतत भुंकत असल्याने भांबाडे यांनी घराचे दार उघडून बाहेर पाहिले. त्याचवेळी बिबट्याने घरात घुसून कुत्र्यावर झडप घातली.
कुत्र्याला वाचवण्यासाठी भांबाडे पुढे सरसावले असता बिबट्याने कुत्र्याला सोडून त्यांच्यावरच हल्ला चढविला. त्यांच्या आरडाओरडी नंतर शेजारील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत गोंधळ घातला. त्यामुळे बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला.
या हल्ल्यात भांबाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.


