राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील पाच पुस्तकांचे प्रकाशन
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील पाच पुस्तकांचे प्रकाशन
मुंबई :
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास आणि साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य व विचारांवर आधारित पाच पुस्तकांचे प्रकाशन लोकभवन येथे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात संत रविदास आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
तहसीलदार स्नेहलता स्वामी (बिंदू) लिखित ‘संत रविदास म्हणे’, तसेच मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : साहित्यविचार, संशोधन आणि चिंतन’, ‘अण्णा भाऊ साठे : आकलन आणि आस्वाद’, ‘अण्णा भाऊ साठे : अवधारणा और जागरण’ (हिंदी) आणि डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. माणिक सोनावणे व डॉ. धनाजी ऊर्फ धनंजय सोमनाथ भिसे संपादित ‘अण्णा भाऊ साठे : अ ट्रान्सनॅशनल लिटररी लेगसी’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले.
लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी सांगितले. महान व्यक्तींचे विचार आणि मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात साहित्याची महत्त्वपूर्ण भूमिका असून, भारतातील संत परंपरा ही समानतेची चळवळ होती. मात्र या परंपरेच्या योगदानाची इतिहासात पुरेशी नोंद झालेली नाही, असे त्यांनी नमूद केले.
साहित्य विविध भाषा आणि पिढ्यांना जोडण्याचे कार्य करते. उत्तम लेखन मन आणि हृदयाला स्पर्श करून विचारांना दिशा देते, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करताना त्यांनी फुलांऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. फुले कोमेजतात; मात्र पुस्तकांमधील विचार दीर्घकाळ प्रभाव निर्माण करतात, असे त्यांनी नमूद केले.
लेखन आणि लेखकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महाराष्ट्राचा समृद्ध साहित्यिक वारसा जतन करून तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
या प्रकाशन सोहळ्यास पद्मश्री रमेश पतंगे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विष्णु वझे तसेच आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे उपस्थित होते.