तुकाराम मुंढेंच्या कामाची न्यूयॉर्क टाइम्सकडून दखल
तुकाराम मुंढेंच्या कामाची न्यूयॉर्क टाइम्सकडून दखल
रॉक स्टार’ म्हणून फ्रंट पेजवर उल्लेख
मुंबई :
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्नसुरक्षा मोहिमेची अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. ४ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या वृत्तात मुंढे यांच्या कामाचा उल्लेख करताना त्यांना ‘फूड इन्स्पेक्टर रॉक स्टार’ असे संबोधण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेची न्यूयॉर्क टाइम्सने दखल घेतली. रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, गोदामे तसेच इतर आस्थापनांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमुळे अन्नसुरक्षेचा विषय चर्चेत आला आहे. त्यांच्या कारवाईमुळे खाद्य व्यवसाय क्षेत्रातही या मोहिमेची विशेष चर्चा झाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने मुंढे यांच्या मोहिमेच्या प्रभावाचे वर्णन करताना ग्राहकांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि खाद्य व्यवसायांवर होणारी कठोर कारवाई यांचा उल्लेख केला आहे. मे २०२६मध्ये महाराष्ट्र FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर अन्नसुरक्षा तपासण्या करण्यात आल्याचे वृत्तांत नमूद करण्यात आले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्ताची दखल घेत तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, “चांगले प्रशासन हे मथळे मिळविण्यासाठी नव्हे, तर बदल घडवून आणण्यासाठी असते,” असा संदेश दिला. अन्नसुरक्षा म्हणजे नागरिकांचे संरक्षण, नियमांचे पालन आणि जनतेचा संस्थांवरील विश्वास निर्माण करणे असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंढे यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय माध्यमाने दखल घेतल्याने महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची चर्चा आता जागतिक स्तरावर झाली आहे. महाराष्ट्रातील प्रशासन आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे.