राज्यसभेच्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा
नवी दिल्ली
भारतीय निवडणूक आयोग यांनी राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेत महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, संबंधित सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १६ मार्च २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० अशी निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५.०० वाजता मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, विशेषतः महाराष्ट्रातील ७ जागांवर सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे या निवडणुकीचा निकाल ठरणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २० मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते छाननी आणि माघार घेण्यापर्यंतची प्रक्रिया आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडली जाणार आहे. संबंधित राज्यांच्या विधानसभांमध्ये मतदान होणार असून, सर्व राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


