राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत ओसरगावच्या दिव्या राणे हिने पटकावला द्वितीय क्रमांक
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव येथील दिव्या दिलीप राणे हिने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातील राज्यभरातील ४८ स्पर्धक सहभागी झाले होते. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दिव्या राणे हिने उपविजेतेपद पटकावले. दिव्या ही युवक कल्याण पतपेढी कणकवलीचे व्यवस्थापक दिलीप राणे यांची कन्या असून, ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास ऊर्फ बबली राणे यांची ती पुतणी आहे.
दिव्या हिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.


