राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश
मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट; पूरस्थिती, मदतकार्य व महामार्गांवरील वाहतुकीचा घेतला आढावा
🔥 दैनिक सिंधुदुर्ग समाचार
मुंबई, दि. ६ जुलै : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन अतिवृष्टी, पूरस्थिती, आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्याचा सविस्तर आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना तातडीने मदत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई शहर, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरसह विविध जिल्ह्यांतील पावसाची परिस्थिती जाणून घेतली. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे आणि आपत्तीग्रस्तांना त्वरित मदत उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई–पुणे, मुंबई–गोवा आणि मुंबई–अहमदाबाद महामार्गांवरील वाहतुकीची स्थिती, आषाढी वारीनिमित्त निघालेल्या पालखी सोहळ्याची व्यवस्था, कोयना धरणातील पाणीसाठा तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीस्थितीची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली.
समुद्रात येणारी भरती आणि अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांनी अलर्ट मोडवर राहून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरू ठेवावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव (नगरविकास) के. एच. गोविंदराज, प्रधान सचिव (जलसंपदा) एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सचिव (आरोग्य) ई. रविंद्रन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.