मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्जाची मुदत १७ जुलैपर्यंत वाढवली
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्जाची मुदत १७ जुलैपर्यंत वाढवली
अतिवृष्टी आणि महा ई-सेवा केंद्रांच्या संपामुळे निर्णय; अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांना दिलासा
कोल्हापूर, दि. ६ जुलै :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत १७ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत यापूर्वी ३ जुलै निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील अतिवृष्टी तसेच महा ई-सेवा केंद्रांच्या संपामुळे लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले.
या पार्श्वभूमीवर इच्छुक स्वयंसहाय्यता बचत गटांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज सादर करण्याची मुदत १७ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.