संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज; सर्व यंत्रणांची तयारी पूर्ण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची माहिती
पंचगंगा नदी पुढील २४ ते ४८ तासांत इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता
कोल्हापूर, दि. ६ जुलै : जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून, सर्व संबंधित विभाग आणि यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिली.
मुंबई येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण आणि पूरबाधित जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणीपातळीची स्थिती, बचाव व मदतकार्याची तयारी, संभाव्य स्थलांतराचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.
त्यानंतर झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले की, ३ जुलैपासून जिल्ह्यात सरासरी ५० मिमी पावसाची नोंद होत असून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत दर २४ तासांत सुमारे ६ ते ७ फुटांनी वाढ होत आहे.
घाटमाथ्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरमाथ्यावरील पाणी नदीपात्रात येत असून, पुढील २४ ते ४८ तासांत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्ण सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
‘जीवितहानी टाळणे हेच सर्वोच्च प्राधान्य’ असल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर शहरासह नदीकाठच्या सखल भागांतील नागरिकांचे आवश्यकतेनुसार वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
दरवर्षी पूरग्रस्त होणारी गावे आणि पाण्यामुळे संपर्क तुटणाऱ्या रस्त्यांजवळ आवश्यक मनुष्यबळ, बोटी, यंत्रसामग्री आणि इतर बचाव साहित्य आगाऊ उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पाटोळे, संबंधित विभागांचे कार्यकारी अभियंते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट ठेवून जलद प्रतिसाद प्रणाली अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. पूर नियंत्रण, बचाव आणि मदतकार्याशी संबंधित सर्व पथकांनी सतर्क राहून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देश त्यांनी दिले.