राज्यातील बाल वैज्ञानिकांची झेप आता थेट नासापर्यंत
‘शासन निर्णय’ जारी.
राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करून पाठपुरावा केलेल्या ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या अभिनव उपक्रमाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील नासा आणि भारतातील इस्रो या नामवंत संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांना अनुसरून राज्यातील शिक्षण पद्धतीत प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्ती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सातत्याने प्रयत्नशील होते.
त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे आता विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाचे धडे मिळणार आहेत.
राज्यातील तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या २,१४८ विद्यार्थी आणि २० पर्यवेक्षकांसाठी नजीकच्या विज्ञान केंद्राची (नागपूर, पुणे किंवा मुंबई) सहल आयोजित केली जाईल. यासाठी प्रति व्यक्ती २० हजार रुपये खर्च जिल्हा नियोजन समितीमधून (डीपीडीसी) करण्यात येईल.
जिल्हा स्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना आणि ८ शिक्षकांना बंगळूरू येथील इस्रो केंद्राला भेट देण्यासाठी शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी प्रति व्यक्ती २५ हजार रुपये खर्च निर्धारित केला आहे. यामध्ये सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी अशा सर्व गटांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यस्तरीय प्रदर्शनातील उत्कृष्ट ५१ बाल वैज्ञानिक आणि ४ अधिकारी अशा एकूण ५५ जणांना अमेरिकेतील नासा केंद्राच्या ८ दिवसांच्या भेटीसाठी पाठवण्यात येईल. यासाठी प्रति व्यक्ती ६ लाख रुपये याप्रमाणे एकूण ३ कोटी ३० लक्ष रुपयांच्या खर्चास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.


