राज ठाकरेंची भाजपवर टीका; ‘सत्तेत असूनही लोकशाही वाचवा मोर्चे काढणे हे जगातील एकमेव उदाहरण’
राज ठाकरेंची भाजपवर टीका; ‘सत्तेत असूनही लोकशाही वाचवा मोर्चे काढणे हे जगातील एकमेव उदाहरण’
गोकुळ प्रकरणावरूनही उपस्थित केले सवाल
मुंबई :
भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाही ‘लोकशाही वाचवा’ या मुद्द्यावरून मोर्चे काढत आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा काढणे हे जगातील एकमेव उदाहरण असेल, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
राज ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या प्रकरणाचा दाखला दिला. गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे १३ उमेदवार निवडून आले होते. ही निवडणूक बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने पार पडली होती. मात्र, त्यानंतर सरकारने स्वतःचे पाच संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीची खरोखरच काळजी असती, तर सरकारने असा प्रकार केला नसता, असे सांगत गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजपने आपली तत्त्वे बाजूला ठेवली, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा दुष्काळ निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली. सत्तेत असताना लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढायचे आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळायचा, अशी भाजपची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
देशातील दहशतवादी हल्ले, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तसेच अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरही भाजपच्या भूमिकेवर त्यांनी उपरोधिक भाष्य केले. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे सांगत आता अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही भाजप मोर्चे काढेल, असा टोला त्यांनी लगावला.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणे बंद करावे. विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे भाजपला मिळालेल्या बहुमताचा स्वीकार केला आहे. आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली असेल, तर भाजपनेही लोकशाही प्रक्रियेचा आदर करत हे वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केल.