राणेंच्या महायुती घोषणेनंतर भाजपमध्ये भूकंप! अवघ्या काही तासांत ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते खा. नारायण राणे यांनी जाहीर केलेल्या महायुतीच्या जागावाटप फॉर्म्युल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कणकवली येथे रविवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप–शिंदे शिवसेना–राष्ट्रवादी (अजित पवार गट) या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच अवघ्या काही तासांत भाजपच्या तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
या राजीनामा नाट्यात ओबीसी मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, मंडळ अध्यक्ष, युवा मोर्चा पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच जिल्हा परिषद माजी सदस्यांचा समावेश असून, ओरोस मंडळातील पक्ष संघटनाच हादरल्याचे चित्र आहे. या सामूहिक राजीनाम्यामुळे जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद ऊर्फ भाई सावंत यांच्यासह ओरोस मंडळातील भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश ऊर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व जि. प. माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक बूथ अध्यक्ष व शक्तिकेंद्र प्रमुखांनीही एकत्रितपणे पदत्याग केला आहे.
आनंद ऊर्फ भाई सावंत यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात सध्याच्या राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत, या परिस्थितीत मंडळ अध्यक्षपदावर राहून काम करणे उचित वाटत नसल्याचे नमूद केले आहे. पक्षातील कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, या राजीनाम्याने जागावाटपावरून असंतोष किती तीव्र आहे, हे स्पष्ट झाले आहे.
महायुतीचा फॉर्म्युला जाहीर होताच उभ्या राहिलेल्या या बंडखोरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि निवडणूक रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष नेतृत्व या नाराजीवर कशी मात करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


