७७ व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ ठरणार आकर्षण

0
22
७७ व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ ठरणार आकर्षण
७७ व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ ठरणार आकर्षण

७७ व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ ठरणार आकर्षण

७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी देशाची राजधानी नवी दिल्ली पूर्णतः सज्ज झाली आहे. यंदा राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने हा सोहळा ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणार आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या या भव्य संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ राज्याची सांस्कृतिक परंपरा आणि आर्थिक सामर्थ्य जागतिक पातळीवर सादर करणार आहे.

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीबाबत अधिकृत माहिती दिली. यंदाच्या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भारताच्या लष्करी क्षमतेसोबतच सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडणार आहे.

यंदाच्या संचलनात देशभरातील एकूण ३० चित्ररथ सहभागी होणार असून त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजजागृतीची जी चळवळ उभी केली, ती आज आधुनिक भारताच्या आत्मनिर्भरतेचा पाया कशी ठरत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथातून साकारले जाणार आहे. गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, कलाकार व सजावट उद्योगांना मिळणारा रोजगार आणि त्यातून उभी राहिलेली व्यापक आर्थिक साखळी याचे दर्शन यात घडेल. ढोल-ताशा पथकांच्या गजरात सामाजिक सलोखा आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेश अधोरेखित केला जाणार आहे.

लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच ‘बॅटल ॲरे’ ही युद्धरचना सादर करण्यात येणार आहे. यात अर्जुन रणगाडा, टी-९० भीष्म टँक, राफेल लढाऊ विमाने तसेच स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचे भव्य दर्शन घडेल. संचलनात १८ लष्करी तुकड्या, १३ बँड्स आणि एकूण ३० चित्ररथ सहभागी होणार आहेत. सुमारे २,५०० कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला ऑस्कर विजेते संगीतकार एम.एम. कीरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा प्रभावी आवाज लाभणार आहे.

यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा ‘जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित असून १०,००० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ, ‘लखपती दीदी’ आणि प्रगतिशील शेतकरी यांचा समावेश आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी ‘राष्ट्रपर्व’ हे विशेष पोर्टल आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, तिकीटधारक प्रेक्षकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. तसेच २६ ते ३१ जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’चे आयोजन करण्यात येणार असून, तेथेही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव देशवासियांना घेता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here