राधानगरी धरण 97.98 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरण 97.98 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर :
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून राधानगरी धरण 97.98 टक्के भरले आहे. धरणात सध्या 8.19 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून सायंकाळी 4 वाजेच्या अहवालानुसार सिंचन तसेच विद्युत विमोचकातून 1,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून पंचगंगा, कासारी, भोगावती, कुंभी, दूधगंगा, वारणा, वेदगंगा, धामणी, हिरण्यकेशी आणि तुळशी नदीवरील एकूण 37 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. तसेच कासारी, भोगावती, कुंभी, दूधगंगा, वारणा, वेदगंगा, धामणी, हिरण्यकेशी आणि तुळशी नदीवरील अनेक बंधाऱ्यांवरूनही पाणी वाहत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती समाधानकारक असून राधानगरी (97.98%), चित्री (98.91%), कडवी (93.26%), आंबेआहोळ (89.15%), वारणा (85.13%), कासारी (83.97%) आणि तुळशी (79.91%) धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, सर्फनाला आणि कोदे लघु पाटबंधारे प्रकल्प हे 100 टक्के भरले आहेत.
दरम्यान, पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 32.2 फूट, सुर्वे 30.4 फूट, रुई 59.10 फूट, इचलकरंजी 56.1 फूट, तेरवाड 50 फूट, शिरोळ 40.8 फूट आणि नृसिंहवाडी 38.3 फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. शेजारच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे पाणीपातळी 18.5 फूट आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवरून वाहतूक टाळण्याचा सल्ला दिला आहे.