CSR निधीतून श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,गावतळे विद्यालयाला संरक्षक भिंत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला नवी बळकटी
CSR निधीतून श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,गावतळे विद्यालयाला संरक्षक भिंत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला नवी बळकटी
ॲव्हीटास कॅपिटल व समजोता फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; अनुराग सेठ यांचे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
दापोली, प्रतिनिधी : अरविंद अनंत मांडवकर,
विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळेच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथे ॲव्हीटास कॅपिटलच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून तसेच समजोता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या शालेय संरक्षक भिंतीच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
ॲव्हीटास कॅपिटलचे अनुराग सेठ व असिमा सेठ यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले, तर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक एस. वाय. काटे यांच्या हस्ते नामफलकाचे पूजन झाले. लेझीम व झांजपथकाच्या पारंपरिक गजरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनुराग सेठ म्हणाले, “शिक्षण हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आम्ही आमच्या क्षेत्रात जी वेगळी ओळख निर्माण केली, ती शिक्षणामुळेच शक्य झाली. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”
एस. वाय. काटे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व विशद करत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. रेणुका दिवाण व संगीता अरोरा यांनी समजोता फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
जनकल्याण फाउंडेशनच्या वैशाली गमरे यांनी मान्यवरांना भेट देऊन सन्मानित केले. विद्यालयाच्या प्राचार्या भक्ती सावंत यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतीची आवश्यकता स्पष्ट केली.
पंचक्रोशी स्कूल कमिटीचे अध्यक्ष एन. वाय. पवार यांनी समाजाच्या सक्रिय सहभागातूनच शैक्षणिक संस्थांचा विकास शक्य असल्याचे सांगत, या विद्यालयाच्या उभारणीत समाजाचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मांडवकर, गावतळेच्या सरपंच विधी पवार, पोलीस पाटील विशाल म्हाब्दी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत पवार, केंद्रप्रमुख एस. एस. जंगम, पंचक्रोशी स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष भरत दाभोळकर, खजिनदार प्रदीप म्हाब्दी, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा नंदिनी दाभोळकर, मारुती पवार, दादा डाकवे, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे डेपो मॅनेजर भास्कर सावंत, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी . जे. कुचनुरे व यू. एन. चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन एन. एल. कालेकर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेली ही संरक्षक भिंत केवळ एक बांधकाम नसून, सामाजिक उत्तरदायित्व आणि शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.