रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ नवीन पनवेल येथे उत्साहात संपन्न
रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ नवीन पनवेल येथे उत्साहात संपन्न
नवीन पनवेल येथे आयोजन; लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, काव्यलेखन, पथनाट्य व निबंध स्पर्धांत युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग
रायगड :
रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा जिल्हास्तरीय ‘युवा महोत्सव २०२६-२७’ नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि संस्थांमधील युवक-युवतींनी या महोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
महोत्सवात लोकनृत्य आणि लोकगीतांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. तसेच चित्रकला, काव्यलेखन, निबंध आणि पथनाट्य स्पर्धांमधून तरुणाईने आपली सर्जनशीलता, कलात्मकता आणि सामाजिक जाणीव प्रभावीपणे व्यक्त केली. देशप्रेम आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या विविध सादरीकरणांनी महोत्सवात विशेष रंगत आणली.
स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतानाच त्यांना जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळवून देणारे हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले.
युवा शक्तीतील सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीला चालना देत त्यांच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र घडविण्याचा संदेश या युवा महोत्सवातून देण्यात आला.