रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड सोमवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात आयोजित विशेष सभेत करण्यात आली. पिठासीन अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

या निवड प्रक्रियेत आराठी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, आंबेपूर जिल्हा परिषद सदस्य रसिका केणी, भाजपचे गटनेते वैकुंठ पाटील आणि कळंब जिल्हा परिषद सदस्य नारायण डामसे यांच्या प्रत्येकी एकच अर्ज सभापतीपदासाठी दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
चारही सभापतींची बिनविरोध निवड झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी नव्याने निवडून आलेल्या सभापतींचे अभिनंदन केले.


