दादरमध्ये २७ व २८ मार्चला मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सव
मुंबई : मुंबई शहरचा जिल्हा ग्रंथोत्सव दि. २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवानिमित्त विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाची सुरुवात २७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.
या दोन्ही दिवसांत शासकीय प्रकाशनांसह विविध खासगी प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांची अनेक विषयांवरील पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे ग्रंथप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यरसिकांना पुस्तकांचा समृद्ध मेळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
मुंबईकर नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी केले आहे


