रायगड डाक विभागात पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट भरती
रायगड डाक विभागात पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट भरती
१० ऑगस्ट रोजी वॉक-इन मुलाखती
अलिबाग, दि. २ :
भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या रायगड डाक विभागामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI) साठी डायरेक्ट एजंट नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, रायगड डाक विभाग, अलिबाग कार्यालयात वॉक-इन मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरतीसाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य तसेच विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र व्यक्तींना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे पद नियमित वेतनाधारित नसून कमिशन आधारित आहे. देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह सरकारी जीवन विमा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून काम करण्याची आणि आकर्षक उत्पन्न मिळविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे डाक विभागाने म्हटले आहे.
उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून बारावी किंवा पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लोकांशी संवाद साधण्याची क्षमता, समाजाभिमुख दृष्टीकोन आणि विमा व्यवसायात काम करण्याची इच्छा असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणणे आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना स्वतःच्या नावाने ₹५,००० चे किसान विकास पत्र (KVP) किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) सुरक्षा ठेव म्हणून सादर करावे लागणार आहे.