मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

0
36
मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी
मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

मुंबई–सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

कोकणवासीयांची दीर्घकालीन मागणी पूर्ण

मुंबई, दि. २ :
महाराष्ट्र आणि कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. कोकणातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांची अनेक वर्षांची मागणी यामुळे पूर्ण झाली आहे.
सुमारे ५१० किलोमीटर अंतर व्यापणारी ही रेल्वे सेवा मुंबई महानगर क्षेत्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यान जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ कमी होण्यासह रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचा गाडी क्रमांक १५०८७ तर सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेसचा गाडी क्रमांक १५०८८ असा असेल. ही सेवा दररोज धावणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात येणार आहेत.
या नव्या रेल्वे सेवेचा लाभ कोकणातील हजारो प्रवाशांना होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here