राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा प्रस्तावित; केंद्र सरकारने मागवले जनतेचे अभिप्राय

0
24

नवी दिल्ली, दि. २६ : केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा (सुधारणा) विधेयक, २०२६ च्या मसुद्यावर नागरिकांकडून अभिप्राय आणि सूचना मागवल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांमुळे अंत्योदय अन्न योजना (AAY) अधिक न्याय्य आणि लाभार्थीकेंद्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
प्रस्तावित सुधारणेनुसार, अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा ७ किलो अन्नधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, प्रति कुटुंब जास्तीत जास्त ३५ किलो अन्नधान्य मिळण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. या बदलामुळे कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार अन्नधान्याचे अधिक समतोल आणि न्याय्य वितरण होईल, असा सरकारचा दावा आहे.
सध्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला सदस्यसंख्या विचारात न घेता निश्चित प्रमाणात धान्य दिले जाते. प्रस्तावित सुधारणेमुळे अधिक सदस्य असलेल्या गरजू कुटुंबांना तुलनेने अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या विधेयकाच्या मसुद्यावर नागरिक, तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था तसेच संबंधित भागधारकांकडून १३ जुलै २०२६ पर्यंत अभिप्राय आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त सूचनांचा विचार करून अंतिम विधेयक संसदेत मांडण्यात येणार असल्याची माहिती अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here