सुरक्षित पदपथांवर चालण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार - सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सुरक्षित पदपथांवर चालण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार – सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली, दि. २६ : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘मनियार इलियाझ ऊर्फ शेख रियाझ विरुद्ध पी. अय्यप्पन व इतर’ (२०२६) या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय देत सुरक्षित, स्वतंत्रपणे चिन्हांकित केलेल्या पदपथांवरून चालण्याचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने हा अधिकार भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९(१)(डी) आणि अनुच्छेद २१ अंतर्गत संरक्षित असल्याचे नमूद केले.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीचा भाग आहे. शहरांमधील पदपथांवरील अतिक्रमणे, अपुरी पायाभूत सुविधा आणि असुरक्षित रस्ते यामुळे पादचाऱ्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याची दखल न्यायालयाने घेतली.
उपलब्ध आकडेवारीनुसार, २०१५ ते २०२४ या कालावधीत देशातील पादचाऱ्यांच्या मृत्यूंच्या संख्येत सुमारे १६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, रस्ते अपघातांतील एकूण मृत्यूंपैकी पादचाऱ्यांचा वाटा ९.५ टक्क्यांवरून २०.६१ टक्क्यांपर्यंत वाढला असून, ही चिंताजनक बाब असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, अनुच्छेद १९(१)(डी) अंतर्गत प्रत्येक नागरिकाला देशात मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे आणि सुरक्षित पदपथांवर चालणे हा त्याच अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. याशिवाय अनुच्छेद २१ अंतर्गत जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अर्थ केवळ अस्तित्वापुरता मर्यादित नसून सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि निर्भयपणे सार्वजनिक जागांचा वापर करण्याचाही त्यात समावेश होतो.
तसेच, सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार हा अनुच्छेद १९(१)(अ) मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अनुच्छेद १९(१)(ब) मधील शांततेने एकत्र येण्याचा अधिकार आणि अनुच्छेद १९(१)(क) (१९(१)(सी)) मधील संघटना स्थापन करण्याच्या अधिकारांच्या प्रभावी वापरासाठीही आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या निर्णयामुळे देशभरातील शहरे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुरक्षित व अतिक्रमणमुक्त पदपथ उभारण्याची आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.