राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सिंधुदुर्गात विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन
सिंधुदुर्ग :
महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचा समृद्ध क्रीडा वारसा साजरा करण्यासाठी दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यंदा ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ ही संकल्पना असून, ‘आदर, खेळ आणि हालचाल’ (Tribute, Play and Move) या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित विविध क्रीडा उपक्रम २८ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय व निमशासकीय कार्यालये, मंडळे, प्राधिकरणे, शाळा, महाविद्यालये, मान्यताप्राप्त क्रीडा संघटना, फेडरेशन, क्रीडा अकॅडमी, ज्येष्ठ नागरिक संघ, युवक मंडळे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
युवा पिढीला तंदुरुस्त बनविणे आणि ग्रामीण भागातील क्रीडा कौशल्यांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.
विविध उपक्रमांचे आयोजन
२८ ऑगस्ट रोजी ‘Digital Tributes’, ‘२९ Challenge’, ‘Pass the Ball’ आणि ‘Sports Bandhan’ हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी ‘एक घंटा खेल के मैदान में’, तर ३० ऑगस्ट रोजी ‘Sundays on Cycle’ आणि ‘Run and Ride’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हास्तरीय जलतरण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या या स्पर्धेत ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारांत ८, १०, १२, १४ आणि १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात स्पर्धा होणार आहेत.
कुडाळमध्ये ‘Sundays on Cycle’ सायकल रॅली
३० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि सायकलिस्ट असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Sundays on Cycle’ सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.
सायकल रॅलीसाठी सकाळी ५.१५ वाजता एकत्र येण्याची वेळ, तर ५.३० वाजता फ्लॅग ऑफ करण्यात येणार आहे. सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतराची ही रॅली नयनरम्य मार्गावरून होणार आहे.
रॅलीची सुरुवात इन्स्पायर सायकल्स, कुडाळ येथून होऊन एस. एन. देसाई चौक, पिंगुळी तिठा, पाट रोड, पाट तिठा मार्गे पाट तलाव येथे पोहोचेल. तेथे फोटो ब्रेकनंतर यू-टर्न घेऊन पाट रोडमार्गे पुन्हा इन्स्पायर सायकल्स येथे राईडचा समारोप होईल.
सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी हेल्मेट तसेच सायकलला पुढील व मागील लाईट्स असणे बंधनकारक राहणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित जलतरण स्पर्धा, सायकल रॅली आणि अन्य उपक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, युवक-युवती, खेळाडू आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.