राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त दीपाली खोब्रागडे यांचा देशपातळीवर गौरव
नागपूर l प्रतिनिधी
वीजयंत्रणेची दुरुस्ती करताना खांबावर चढून काम करणारा कर्मचारी म्हटले की सर्वसाधारण -पणे पुरुष लाईनमनची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र ही पारंपरिक प्रतिमा बदलत नागपूर परिमंडळातील दीपाली खोब्रागडे यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
वीज वितरण कंपनी महावितरणच्या नागपूर परिमंडळात कार्यरत असलेल्या दीपाली खोब्रागडे यांचा राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त देशपातळीवर गौरव होणार आहे. या निमित्ताने राजधानी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
राज्यातून निवडण्यात आलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश असून, प्रतिकूल परिस्थितीत धोकादायक काम करत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून हा सन्मान दिला जात आहे. त्यांच्या या यशामुळे महिलाही तांत्रिक व आव्हानात्मक क्षेत्रात सक्षमपणे काम करू शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


