‘लालपरी’ची होळीपूर्व धावपळ
मुंबई l प्रतिनिधी
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने विशेष नियोजन जाहीर केले आहे. ‘होळी जादा ऑपरेशन २०२६’ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड विभागांतून तब्बल १९८ जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत या जादा फेऱ्या कोकणाच्या दिशेने धावणार असून, हजारो प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोकणातील चाकरमानी आणि कुटुंबीयांना होळी सणासाठी गावी पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
ठाणे-मुंबई विभागातून सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, नियमित आरक्षणासोबतच समूह बुकिंगलाही प्राधान्य देण्यात आले आहे. पालघर आणि रायगड विभागांतूनही अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. नियोजनात संतुलन राखत १९८ फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी तर ५७ फेऱ्या समूह बुकिंगसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
२८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सर्वाधिक गर्दी अपेक्षित असून, त्या दिवशी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितता, वेळेचे काटेकोर नियोजन आणि अतिरिक्त बस उपलब्धता यामुळे संभाव्य गैरसोयी टाळण्याचा प्रयत्न करण्यत येत आहे.
एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे होळीच्या सणात प्रवाशांना सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासाचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध होणार असून, ‘लालपरी’ पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.
याशिवाय, प्रमुख बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना मार्गदर्शन, तिकीट आरक्षण आणि वेळापत्रकाबाबत तत्काळ माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक प्रशासनासोबतही समन्वय साधण्यात आला आहे.
होळीच्या आनंदात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली असून, प्रवाशांनी वेळेआधी आरक्षण करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकणाच्या ओढीने धावणारी ‘लालपरी’ यंदाही सणासुदीच्या काळात विश्वासाची सोबती ठरणार आहे.


