कुडाळ, दि. ६ : वर्ल्ड बायसिकल डे २०२६ निमित्त आणि नागरिकांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता कुडाळ येथे जिल्हास्तरीय ‘संडे ऑन सायकल’ विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फिट इंडिया मोहिमेचा हा एक भाग असून सायकल वापराचे महत्त्व अधोरेखित करणे, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हा पोलीस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकलिंग हा आरोग्यदायी, किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही वाहतुकीचा पर्याय असून नियमित सायकल वापरामुळे शारीरिक तंदुरुस्ती राखण्यास मदत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सायकलपटू, क्रीडाप्रेमी, युवक-युवती, विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रॅलीचा मार्ग
कुडाळ पोलीस स्टेशन → अंडरपास → शिवाजी इंग्लिश स्कूल → पणदूर तिठा → कुडाळ पोलीस स्टेशन
या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून वर्ल्ड बायसिकल डेचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.