लाखो वारकऱ्यांच्या पायांनी पवित्र झालेली पंढरीची वाट आणि विटेवर हात कटीवर ठेवून भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा सावळा विठुराया.
✒️लेख : शुभम पांडुरंग गवस
पंढरीची वारी, सावळा तो हरी। वारकऱ्यांच्या मुखी, राम कृष्ण हरी।।
झाले नयन सुखावले, लाभले विठुरायाचे दर्शन। थोर कृपा राहो त्याची, सदैव सर्वांवर अखंड।।
🎯आषाढी एकादशी… हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती भगव्या पताकांची अखंड रांग, टाळ-मृदंगाचा गजर, अभंगांचा स्वर, लाखो वारकऱ्यांच्या पायांनी पवित्र झालेली पंढरीची वाट आणि विटेवर हात कटीवर ठेवून भक्तांची आतुरतेने वाट पाहणारा सावळा विठुराया.
आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, संत परंपरेचा आणि भक्तीच्या अखंड प्रवाहाचा महापर्व आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत सावता माळी, संत गोरा कुंभार अशा अनेक संतांनी या वारीला भक्तीचे अधिष्ठान दिले. त्यांच्या अभंगांनी लाखो हृदयांना भक्तीचा मार्ग दाखवला आणि माणुसकीची शिकवण दिली.
वारकरी पंढरपूरकडे चालत असतात, पण प्रत्यक्षात ती वाट फक्त पायांची नसते; ती मनाची, श्रद्धेची आणि आत्म्याची यात्रा असते. अनेक दिवसांचा प्रवास, ऊन, वारा, पाऊस, चिखल, थकवा… या कोणत्याच गोष्टींची पर्वा न करता वारकरी “राम कृष्ण हरी”चा अखंड जप करत पुढे जात असतो. कारण त्याच्या मनात एकच ओढ असते—माझ्या विठुरायाचे दर्शन.
कधी कधी मनात प्रश्न निर्माण होतो—विठ्ठल नेमका कुठे आहे? तो फक्त पुंडलिकाने अर्पण केलेल्या विटेवर उभा आहे का? की तो प्रत्येक वारकऱ्याच्या रूपाने चालत आहे? दिंडीत टाळ वाजवणाऱ्या त्या वृद्धात, तुळशीची माळ गळ्यात घालून चालणाऱ्या त्या माऊलीत, पायांना फोड आले तरी नाम घेत चालणाऱ्या त्या भक्तात, तहानलेल्या वारकऱ्याला पाणी पाजणाऱ्या सेवाभावी हातात… प्रत्येक ठिकाणी विठ्ठलच दिसतो.
वारी म्हणजे चालणारा संतमेळा. येथे श्रीमंत-गरीब, लहान-मोठा, जात-पात, धर्म, भाषा यांचा कोणताही भेद राहत नाही. सर्वांच्या मुखी एकच नाम, सर्वांच्या हृदयात एकच भावना आणि सर्वांच्या डोळ्यांसमोर एकच ध्यास—विठुरायाचे दर्शन. हीच वारीची खरी ताकद आहे.
संतांनी सांगितलेली भक्ती ही केवळ देवळात डोके टेकवण्यापुरती नाही. ती माणसात देव पाहण्याची शिकवण देते. दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणे, सेवा करणे, नम्रता, संयम, प्रेम आणि परोपकार हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. म्हणूनच वारी संपते, पण वारकरीपण कधीच संपत नाही.
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरात लाखो भाविक विठुरायाचे दर्शन घेतात. त्या दर्शनाने डोळे भरून येतात, मन शांत होते आणि आयुष्याला नवी ऊर्जा मिळते. त्या क्षणी वाटते, विठ्ठल फक्त मंदिरात नाही; तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. जिथे प्रेम आहे, तिथे विठ्ठल आहे. जिथे सेवा आहे, तिथे विठ्ठल आहे. जिथे नामस्मरण आहे, तिथे विठ्ठल आहे.
आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि स्वार्थी जगात वारी आपल्याला एक अनमोल संदेश देते—माणुसकी जपा, प्रेमाने जगा, सर्वांना आपले माना आणि ईश्वराचे नाम कधीही सोडू नका. कारण विठ्ठलाला मोठे दान नको, मोठा देखावा नको; त्याला हवे असते ते निर्मळ मन आणि निस्सीम भक्ती.
म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी पंढरीची वाट धरतात. कारण त्यांना खात्री असते की विटेवर उभा असलेला सावळा हरी त्यांच्या एका हाकेला नक्की धावून येईल. तो कधी आईच्या मायेच्या रूपात, कधी संतांच्या वचनांत, कधी सेवाभावी हातांत, तर कधी आपल्या अंतःकरणातील शांततेच्या रूपात भेटत राहतो.
आषाढी एकादशी हा केवळ सण नसून, तो भक्ती, समता, प्रेम, सेवा आणि माणुसकीचा अखंड उत्सव आहे. या उत्सवातून प्रत्येकाने संतांचे विचार आचरणात आणले, तर प्रत्येक घर पंढरी होईल आणि प्रत्येक मन विठ्ठलमय होईल. राम कृष्ण हरी…! विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…!!