वालावल पंचायत समिती मतदार संघातील प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. येत्या चार दिवसात कारवाई न झाल्यास कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडू असा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे यांनी दिला आहे.
नेरुर ते कवठी आणि वालावल ते हुमरमळा या दोन्ही रस्त्यांलगत झाडी, गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून रात्रीच्या वेळी आणि वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत वारंवार लेखी आणि तोंडी मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे, असे सौ. बंगे म्हणाल्या.
“जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जर येत्या चार दिवसांच्या आत या रस्त्यांवरील झाडी तोडून ती बाजूला करण्याची कार्यवाही झाली नाही, तर आम्ही या रस्त्यावरील झाडी टेम्पोमध्ये भरून ती थेट कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणून टाकू आणि तेथेच ठिय्या आंदोलन करू” असा इशारा सौ. अर्चना बंगे यांनी दिला आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.