विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0
20
विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत सिंधुदुर्गच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा – शुभांगी साठे

सिंधुदुर्ग:
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२५-२६’ मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य आणि ज्ञानपरंपरेचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना शुभांगी साठे म्हणाल्या की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि ज्ञानपरंपरेची वाहक आहे. जागतिकीकरण आणि डिजिटल युगात नव्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात, वाचन-लेखनात तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक वापर करावा. विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य, विश्वकोश, चरित्रग्रंथ आणि संदर्भग्रंथांचे नियमित वाचन करून ज्ञानसमृद्ध होण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा वरळे, शिक्षणतज्ज्ञ प्रविण शेवडे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य वामन पंडित, म. ल. देसाई, डॉ. शरयू आसोलकर, वृंदा कांबळी तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्रीम. तांबे उपस्थित होते.
यंदा प्रथमच राज्यभर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेची परीक्षा २९ मार्च २०२६ रोजी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० शाळांमधील ९३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हास्तरावर १० विद्यार्थ्यांनी, तर तालुकास्तरावर ३९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले.
स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर अनुक्रमे ३,०००, २,००० आणि १,००० रुपये, तर तालुकास्तरावर १,०००, ७५० आणि ५०० रुपये रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
जिल्हास्तरीय विजेते
शहरी विभाग :
  • प्रथम – कु. संगम तेजस्वी (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी)
  • द्वितीय – कु. एकता तांडेल (भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मालवण)
  • द्वितीय – कु. अमेय आपटे (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी)
  • तृतीय – कु. साक्षी गुरव (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी)
ग्रामीण विभाग :
  • प्रथम – कु. सोहम टेंबुळकर (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे)
  • द्वितीय – कु. अक्षया गोवेकर, कु. नकील गुरुप्रसाद, कु. रत्नदीप सावंत (शंकर एम. विद्यालय, कुंभवडे)
  • तृतीय – कु. सिया (श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वाडाचापाट, मालवण) आणि कु. अश्वमी देसाई (कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ)
स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here