विद्यार्थ्यांसाठी सकाळच्या वेळेत लोकलचे डबे राखीव ठेवावेत
नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
मुंबई, दि. १२ :
मुंबई महानगरपालिकेच्या भाग क्रमांक दोनच्या नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून सकाळच्या गर्दीच्या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकल रेल्वेमध्ये काही डबे राखीव ठेवण्याची मागणी केली आहे.
मुंबई उपनगर आणि शहरातील हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी लोकल रेल्वेने प्रवास करतात. सकाळच्या गर्दीच्या वेळेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रचंड गर्दीमुळे विद्यार्थ्यांना वेळेत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणे कठीण होते. तसेच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी रेल्वे मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सकाळच्या वेळेत काही डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा विचार करावा, अशी विनंती केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने या मागणीचा सकारात्मक विचार करून रेल्वे प्रशासनाने आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.