विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचा विजय निश्चित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानपरिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचा विजय निश्चित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदार सचिन अहिर हे धनुष्यबाण चिन्हावर विधान परिषदेत निवडून आले असून त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले आहे. त्यामुळे ते शिवसेनेचेच आमदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आठवडाभरापूर्वी खासदारांनी “षटकार” ठोकला आणि आज आमदार सचिन अहिर यांनीही “षटकार” ठोकल्याचे सांगत, यापुढेही असे चौकार-षटकार सुरूच राहतील आणि विरोधकांच्या एकामागोमाग एक विकेट पडतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
विधानसभा आणि विधान परिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे येत्या बुधवारी सचिन अहिर यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मुंबईपुरते नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देणारे उपसभापती म्हणून ते काम करतील, असे सांगितले.
“आम्ही तोडकाम नाही, तर जोडकाम करतो. काही लोक तुडवायला आले, तर आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी आलो आहोत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर आम्ही वाटचाल करत आहोत,” असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार ओमराजे निंबाळकर, प्रवक्ते किरण पावसकर, राहुल लोंढे, शीतल म्हात्रे तसेच शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.