वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार; २२.२४ कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

0
5
वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार; २२.२४ कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन
वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार; २२.२४ कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारणार; २२.२४ कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभादांडा, वेंगुर्ला येथे देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २२.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या केंद्रामुळे कोकणातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा मिळण्यासह स्थानिकांच्या आर्थिक समृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील मच्छिमारांना जागतिक स्पर्धेत सक्षम करण्यासाठी मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासह मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणारे बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे विविध प्रजातींच्या मत्स्यबीज उत्पादनाला चालना मिळणार असून, मत्स्यशेतीच्या विस्तारासाठी मदत होईल. तसेच महिला बचत गट आणि तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मत्स्यव्यवसायातील टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, सरपंच नीलेश चमणकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त महेश देवरे, दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार, शास्त्रज्ञ पंकज पाटील, सहआयुक्त नागनाथ भादुले आणि सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवसेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या केंद्रामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना मिळून स्थानिक मच्छिमार, महिला आणि युवकांसाठी आर्थिक प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here