वेलंकणी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाडीची मागणी
पालघर l प्रतिनिधी
जुलै महिन्यात होणाऱ्या वेलंकणी मातेच्या यात्रेसाठी पालघर, ठाणे, मुंबई आणि उपनगरातील हजारो ख्रिश्चन कोळी बांधव दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होतात. मात्र, थेट रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांना अत्यंत कष्टदायक प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र देऊन मुंबईतील वांद्रे टर्मिनस ते वेलंकणी चर्च दरम्यान ३ व ४ जुलै २०२६ रोजी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची तसेच १६ व १७ जुलै २०२६ रोजी परतीसाठी विशेष गाडी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
दरवर्षी सुमारे २० हजार भाविक या यात्रेसाठी जातात. विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्यास त्यांना सुरक्षित, सुलभ आणि नियोजित प्रवासाची सुविधा मिळेल, तसेच इतर नियमित गाड्यांवरील ताणही कमी होईल, असे खासदार सवरा यांनी पत्रात नमूद केले आहे. रेल्वे मंत्रालयाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार डॉ. सवरा यांनी पत्रात नमूद केले आहे की, वेलंकणी यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक असून कोळी समाजासह विविध ख्रिश्चन बांधवांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, दरवर्षी आरक्षणाची अडचण, गाड्यांतील प्रचंड गर्दी आणि बदल्या गाड्यांमुळे भाविकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल. तसेच गटाने प्रवास करणाऱ्या भाविकांचे नियोजन सुलभ होईल आणि अनावश्यक दलाली व अतिरिक्त खर्चालाही आळा बसेल, असे मत स्थानिक बांधवांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने मागणीचा तातडीने विचार करून वेळापत्रक जाहीर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


