शालेय सहलींसाठी फक्त एसटी बसेसच अनिवार्य
खाजगी बसांना सरकारची बंदी
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शाळांनी शालेय सहलींसाठी फक्त एमएसआरटीसीच्या लालपरी बसेसच वापराव्या लागणार आहेत. खाजगी बस, शालेय बस किंवा इतर कोणत्याही खासगी वाहनांचा सहलींसाठी वापर करण्यास सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे.
सरकारचे म्हणणे आहे की, शालेय सहलींमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून, एसटी बसेस या सुरक्षित आणि शासकीय नियंत्रणाखालील असल्याने त्यांचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे वाहनांची क्षमता, वाहनचालकांची तपासणी, नियमांचे पालन आणि आपत्कालीन परिस्थितीतील व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे, असे सरकारचे मत आहे.
नवीन नियमांनुसार, शाळांनी आता सहलींचे नियोजन करताना मनोरंजन उद्याने, वॉटरपार्क किंवा रिसॉर्ट्सऐवजी ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळांना प्राधान्य द्यावे. विद्यार्थी सहली ज्ञानवर्धक आणि सुरक्षित व्हाव्यात, यासाठी हा निर्णय घेतल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच, प्रत्येक सहलीदरम्यान शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, परवानगी प्रक्रिया आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेही शाळांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अधिक बळकट होईल, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले असून, सरकारी निर्णयाचे स्वागत राज्यभरातून होत आहे


