शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पदवीधर संघटनेचा जाहीर पाठिंबा
मुंबई, दि. २८ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पदवीधर संघटना, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही भूमिका स्पष्ट करत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
डॉ. काळे म्हणाले की, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून त्यावर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. या आंदोलनात २० टक्के ते ८० टक्के अनुदान घेणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच वर्ग तुकड्यांना प्रचलित नियमानुसार १ जून २०२६ पासून वाढीव अनुदानाचे टप्पे लागू करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना २५ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान मंजूर करणे, तसेच कमी पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना संचमान्यतेनुसार पदे ग्राह्य धरून अनुदान देणे, अशा महत्त्वाच्या मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे. एकूण आठ प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाचा लढा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पदवीधर संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, अशी ग्वाही डॉ. नरेंद्र काळे यांनी दिली.


