दुर्गराज रायगडावर शासनाचा अत्याधुनिक रोपवे उभारण्यास मान्यता
प्रवाशांना ५० ते १०० रुपयांत प्रवासाची शक्यता
रायगड, दि. २८ : दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अत्याधुनिक रोपवे उभारण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाकडून (ASI) मान्यता मिळाली असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांना सध्या आकारल्या जाणाऱ्या सुमारे ३२५ ते ३५० रुपयांच्या भाड्याऐवजी ५० ते १०० रुपयांच्या दरात गडावर जाण्याची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, गडावरील संवर्धन कामांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीवरील कोट्यवधी रुपयांच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाने दिली.

सध्या दुर्गराज रायगडावर कार्यरत असलेल्या खासगी रोपवेद्वारे प्रतिव्यक्ती ३२५ रुपये भाडे आकारले जाते. तसेच संवर्धनाच्या कामांसाठी गडावर नेण्यात येणाऱ्या साहित्यावर प्रतिकिलो ६.३० रुपये वाहतूक शुल्क आकारले जात असल्याने संवर्धन प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे प्राधिकरणाने नमूद केले.



