‘आरोहण’ राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; कलाकारांनी जिंकली रसिकांची मने
कुडाळ : जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या युवा सेवा आणि क्रीडा संचालनालयातर्फे श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोहण’ राष्ट्रीय युवा महोत्सवात देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आपल्या दमदार ढोल नृत्याने देशभरातील रसिकांची मने जिंकली. ११ ते १३ मे दरम्यान शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र (SKICC) येथे हा महोत्सव उत्साहात पार पडला. देशातील ११ राज्यांतील संघांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता.
देवगडच्या स. ह. केळकर महाविद्यालयाने याच ढोल नृत्याच्या जोरावर यंदाच्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात सुवर्णपदक पटकावले होते. लोकनृत्य प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाने मिळवलेले हे पहिलेच सुवर्णयश ठरले होते.
या नृत्याचे मुख्य प्रशिक्षक मुंबईचे भूषण पाटील असून सिंधुदुर्गातील सागर सारंग आणि रोहित माने यांनी त्यांच्याकडून या कलेचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये या नृत्याला यश मिळवून दिल्यानंतर देवगड कॉलेजसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली. ऑडिशनद्वारे निवडलेल्या दहा विद्यार्थ्यांना कठोर सरावातून या लोकनृत्याची तालीम देण्यात आली.
ठाणे-पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा परिसरातील आदिवासी संस्कृतीशी निगडित असलेले हे ढोल नृत्य ढोल आणि पत्र्याच्या डब्यांच्या तालावर सादर केले जाते. पायात घुंगरू बांधून विविध मनोरे आणि तालबद्ध हालचाली हे या नृत्याचे वैशिष्ट्य मानले जाते. या अवघड नृत्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज अनेक तास मेहनत घेतली.
राष्ट्रीय स्तरावर कला सादर करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या कलाकारांना ‘आरोहण’ महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली. कमी वेळ असूनही नव्या जोमाने सराव करून कलाकार श्रीनगर येथे दाखल झाले. SKICC च्या क्रीडा संकुलात सादर करण्यात आलेल्या या ढोल नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. नृत्याच्या तालावर अनेक रसिकांनी ठेका धरत कलाकारांचे कौतुक केले.
या यशस्वी सादरीकरणानंतर कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते पदक, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या पथकात साहिल दीपक जाधव, तनिष हिरोजी नाईक, साहिल दिलीप जाधव, अभिषेक चारुदत्त शिंदे, भावेश हर्ष डेगवेकर, रितेश संदीप धुरी, करण मंगेश मेस्त्री, साईनील सुनील धुरे, योगीराज चंद्रशेखर नार्वेकर, प्रफुल प्रकाश हजारे आणि शिवमणी अजय पाळेकर यांचा सहभाग होता.
या सर्व कलाकारांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. नितीन वळंजू यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. मेहनत, जिद्द आणि कलेच्या बळावर सिंधुदुर्गच्या या युवा कलाकारांनी जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्राची कला प्रभावीपणे सादर करत विशेष छाप पाडली.