संत रोहिदास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्जांचे आवाहन
संत रोहिदास महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी अर्जांचे आवाहन
मुंबई उपनगर जिल्ह्यात २० लाभार्थ्यांना संधी
मुंबई : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ‘५० टक्के अनुदान योजना’ आणि ‘बीज भांडवल योजना’ राबविण्यात येत असून इच्छुक लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, ५० टक्के अनुदान योजनेअंतर्गत ९ लाभार्थी, तर बीज भांडवल योजनेअंतर्गत ११ लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. या योजनांच्या माध्यमातून चर्मकार समाजातील युवक व उद्योजकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर, होलार आदी) असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्जाच्या तीन प्रती तयार करून संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, मुंबई शहर जिल्हा कार्यालय, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे कार्यालयीन वेळेत स्वतः उपस्थित राहून मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसह कर्ज प्रस्ताव सादर करावेत.
या योजनांचा लाभ घेऊन चर्मकार समाजातील बांधवांनी आर्थिक स्वावलंबन साधावे तसेच सामाजिक व शैक्षणिक प्रगतीस चालना द्यावी, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.