संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ व २०२५ जाहीर

0
24
संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ व २०२५ जाहीर; महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ व २०२५ जाहीर; महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

संगीत नाटक अकादमी पुरस्कार २०२४ व २०२५ जाहीर

महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

मुंबई : देशातील सर्वोच्च सांस्कृतिक संस्थांपैकी एक असलेल्या संगीत नाटक अकादमीने वर्ष २०२४ आणि २०२५ साठीचे प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत तसेच युवा कलावंतांचा समावेश असून विविध कला क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.
वर्ष २०२४ साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय गायन क्षेत्रातील अरुण कशाळकर, अभंग गायनासाठी आनंद भाटे, अभिनय क्षेत्रातील अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमीतील मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रातील सुभाष नारायण नकारी तसेच नृत्य क्षेत्रातील संशोधनासाठी शुभदा वरदकर यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ २०२४ साठी हिंदुस्थानी गायन क्षेत्रातील कृष्णा बोंगणे आणि अंकिता जोशी, भामक/भावगायन क्षेत्रातील भावार्थ रामचंद्र देवणे, बाहुलीनाट्य क्षेत्रातील बाळकृष्ण गणपत मसगे तसेच लोकनृत्य व लोकसंगीत क्षेत्रातील चेतन वामन खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, वर्ष २०२५ साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये शहनाई वादनासाठी शैलेश भागवत, दिग्दर्शन क्षेत्रातील प्रमोद डी. पवार, नाट्यसंगीत क्षेत्रातील अशोक पत्की आणि कथक नृत्य क्षेत्रातील मनीषा साठे यांचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
याचबरोबर ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ २०२५ साठी हार्मोनियम वादन क्षेत्रातील तमय देवचके आणि लोकसंगीतातील जागर परंपरेसाठी प्रवीण प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक, संगीत, नाट्य आणि लोककला परंपरेचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला असून कला क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here