संयुक्त महाराष्ट्राच्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गोपुरीत उद्या विशेष सभेचे आयोजन

0
13

कणकवली :
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गोपुरी आश्रमात शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता आश्रमाच्या चिकूच्या बागेतील पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ विचारपीठ येथे ही सभा होणार आहे. या सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ संपादक देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश लब्दे आणि गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या इतिहासात २१ नोव्हेंबर १९५५ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मानला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती व्हावी आणि मुंबई महाराष्ट्रातच राहावी, या मागणीसाठी या दिवशी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला होता. हुतात्मा चौकात हजारो नागरिक शांततेच्या मार्गाने निदर्शने करीत असताना आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या घटनेत १०७ आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी दिलेल्या या ऐतिहासिक बलिदानाचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने गोपुरी आश्रमातर्फे या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोपुरी आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here