सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९,७०० कोटींची कंत्राटदारांची देयके अदा; उर्वरित रक्कमही प्राधान्याने देणार – शिवेंद्रसिंह राजे भोसले

0
8
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९,७०० कोटींची कंत्राटदारांची देयके अदा
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९,७०० कोटींची कंत्राटदारांची देयके अदा

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ९,७०० कोटींची कंत्राटदारांची देयके अदा; उर्वरित रक्कमही प्राधान्याने देणार – शिवेंद्रसिंह राजे भोसले

मुंबई :
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत सुमारे ९,७०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. उर्वरित देयकांसाठी निधीची मागणी करण्यात आली असून, निधी उपलब्ध होताच ही देयके प्राधान्याने अदा करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली.
शिवेंद्रसिंह राजे भोसले
शिवेंद्रसिंह राजे भोसले
मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित देयकांसह कंत्राटदारांच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या कामांशी संबंधित सुमारे ४ हजार ८०० कंत्राटदारांची सर्व देयके पूर्णपणे अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे लहान कामे करणाऱ्या कंत्राटदारांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित प्रलंबित देयकांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत डांबराच्या दरवाढीबाबत आवश्यक कार्यवाही, वस्तू व सेवा कराच्या (GST) देयक प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदारांच्या नोंदणी नूतनीकरणासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी राखीव असलेल्या कामांचे वाटप आणि कंत्राटदारांच्या विविध प्रशासकीय अडचणी सोडविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले. कंत्राटदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (इमारती) शरद राजभोज, सचिव (रस्ते) आबासाहेब नागरगोजे, उपसचिव सुरेश नाईक, राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले आणि महासचिव राजेश देशमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here