सावंतवाडीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा यात्रा; नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा यात्रेचा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
सावंतवाडी
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात १० ते १७ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत आहे. या अभियानाला जनसहभागाची जोड देण्यासाठी सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
या तिरंगा यात्रेचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.
यात्रेत नागरिक, युवक, महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा जागर करण्याचा संदेश या तिरंगा यात्रेतून देण्यात आला.
यावेळी आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, अभियान प्रमुख संदीप गावडे, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह भाजप, शिवसेना आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.