सावंतवाडीत ७-८ लाखांचा खैर लाकूड साठा जप्त

0
21
सावंतवाडीत ७-८ लाखांचा खैर लाकूड साठा जप्त
सावंतवाडीत ७-८ लाखांचा खैर लाकूड साठा जप्त

सावंतवाडीत ७-८ लाखांचा खैर लाकूड साठा जप्त

विनापरवाना तोडीवर वनविभागाची कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यातील सोनुर्ली येथे विनापरवाना खैर लाकडाचा साठा केल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर आजगाव वनपरिमंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत खैर प्रजातीचा नगी व किटा स्वरूपातील लाकूड साठा जप्त करण्यात आला असून, बाजारभावानुसार या मालाची किंमत सुमारे ७ ते ८ लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोनुर्ली परिसरात मोठ्या प्रमाणात खैर झाडांची तोड करून त्याचा साठा करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी मिळाली होती. त्यानुसार आजगाव वनपरिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला असता, तेथे मोठ्या प्रमाणात खैर लाकूड आढळून आले.

या प्रकरणी अधिक चौकशी केली असता, हा विनापरवाना लाकूड साठा निरवडे येथील प्रदीप मातोंडकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आणि वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आजगावचे वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अतुल पाटील तसेच वनमजूर चंद्रकांत पडते यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला.

घटनास्थळी आढळलेले काही लाकूड नगी तर काही किटा स्वरूपातील होते. हा सर्व साठा तात्काळ जप्त करून वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त मालाबाबत रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप करत आहेत.

या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, वनविभागाने अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here