सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

0
41
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुख्यमंत्र्यांच्या कणकवली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांचा आक्रोश

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्प दहा वर्षांहून अधिक काळ रखडल्याने कोकणवासीयांमध्ये असंतोष वाढला असून, मुख्यमंत्र्यांच्या कणकवली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस प्रकल्पाला दहा वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कार्यान्वयन न झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कणकवली दौऱ्यावर येत असताना, सावंतवाडी टर्मिनसचा रखडलेला प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, “टर्मिनस की फक्त स्वप्न?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

२०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर तब्बल दहा वर्षे उलटूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास गेलेला नाही. कोकण रेल्वे प्रशासनाकडून आजही या टर्मिनसबाबत स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही अधिकाऱ्यांकडून “हा टर्मिनस असल्याचा पुरावा काय?” असा सवाल उपस्थित केला जात असल्याने कोकणवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्याचे चित्र आहे.

सावंतवाडी टर्मिनस कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची व्यवस्था हा आजही मोठा अडथळा ठरत आहे. तिलारी आंतरराज्य धरणातून टर्मिनससाठी पाणीपुरवठा करण्याची सुमारे १५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र या योजनेला अद्याप मंजुरी मिळालेली नसून, ती केवळ कागदावरच अडकून पडल्याचा आरोप स्थानिक स्तरावर केला जात आहे. परिणामी टर्मिनस प्रकल्प ‘तहानलेलाच’ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (MTDC) सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसरात रेलटेल अर्थात बजेट हॉटेल उभारण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेअंतर्गत वर हॉटेल व खाली टर्मिनस इमारत असा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यासाठी तत्कालीन ‘चांदा ते बांदा’ योजनेतून (सध्याची सिंधुरत्न समृद्धी योजना) सुमारे ३.५ कोटी                                                 

रुपयांचा निधीही मंजूर झाला होता. मात्र कोकण रेल्वे आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाअभावी हा निधी वापरात येऊ शकला नाही आणि अखेर तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आला. परिणामी रेलटेलसह टर्मिनसचे स्वप्नही अपूर्णच राहिले.

या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी करण्यात येत आहे की, कोकणातील ज्या पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, तोच प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष सुरू व्हावा. विविध विभागांकडून निधी उपलब्ध असूनही केवळ प्रशासकीय समन्वयाअभावी प्रकल्प रखडत असल्याने, हा प्रकल्प ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची मागणीही पुढे येत आहे.

कोकण रेल्वे महामंडळाला थेट निधी देण्यात यावा किंवा या महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, पण तिलारीचे पाणी सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचवून सावंतवाडीला खऱ्या अर्थाने टर्मिनसचा दर्जा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.येणाऱ्या राज्याच्या अर्थ संकल्पात हा दहा वर्षे रखडलेला प्रकल्प मार्गी लावावा, अशी ठाम मागणी कोकण वासीयांकडून करण्यात येत असून, “आता आश्वासन नव्हे, कृती हवी,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाला दिला जात आहे.

खास बाब म्हणजे, सावंतवाडी टर्मिनस कार्यान्वित झाल्यास केवळ सावंतवाडीच नव्हे तर संपूर्ण दक्षिण कोकणातील प्रवासी, व्यापारी व पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रश्न केवळ एका रेल्वे स्थानकापुरता मर्यादित नसून, तो कोकणाच्या विकासाशी थेट जोडलेला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here